दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील पोलीस शिपाई आणि अंमलदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ईमेल केला आहे. विशेष म्हणजे जवळपास 4 हजार ईमेल सरकारला पाठवून पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस अंमलदारांना निवृत्त होताना पोलीस अधिकारी बनता यावं, यासाठी महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र त्याच निर्णयाला गालबोट लावण्याचं कामही सरकारनं केलं आहे.
2016 सालच्या MPSC परीक्षेतील अतिरिक्त 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्याचं सरकारनं ठरवलं. या निर्णयामुळं पोलीस दलात मोठा असंतोष उफाळून आला आहे. या 636 उमेदवारांना जसं सामावून घेतलं तसंच खात्यांतर्गत परीक्षा देणाऱ्या 2200 उमेदवारांनाही सामावून घ्यावं, अशी मागणी आता ईमेलद्वारे केली जातेय.
गेल्या पाच वर्षांपासून पोलीस खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाची परीक्षाही घेण्यात आलेली नाही. त्यामुळं या पाच वर्षात पोलीस शिपाई आणि अंमलदारांचं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न अपुरं राहिलं आहे. आता थेट बाहेरून पोलीस अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचा निर्णय या पोलिसांच्या जखमांवर मिठ चोळणारा आहे.