मुंबई : अशिक्षित बोगस डॉक्टरा समवेत 5 बोगस डॉक्टरांना प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 3 च्या पोलिसांनी धाड घालून अटक केली आहे. हे डॉक्टर नागपाडा आणि भोईवाडा परिसरात गेली 10 वर्ष दवाखाना चालवत होती.
समशेर कदिर शेख, अन्वर हुसेन, नईम शेख, नवाब हुसैन, रिझवानुद्दीन बंजारा या पाच बोगस डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे पाचही जण नागपाडा, भोईवडा, करीरोड भागात दवाखाना चालवत होते. यातील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी 7 वी ते 12 वी पर्यंत शिकलेले आहेत. गेली 10 वर्ष हे आपले दवाखाने चालवत होते.
अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आहे. पण ते प्रमाणापत्र दुसऱ्याच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप पोलिसांपर्यंत आलेली नाही. अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी अटक करुन या आरोपींना कोर्टात हजर केलं. या पाचही बोगस डॉक्टरांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.