दोन लसीनंतरही कोरोनाचा धोका! 6 महिन्यांनतर घटते रोगप्रतिकार शक्ती? वाचा तज्ज्ञांचं मत

सहा महिन्यांनंतर दुसऱ्या डोसचा प्रभावही कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे

Updated: Oct 7, 2021, 10:10 PM IST
दोन लसीनंतरही कोरोनाचा धोका! 6 महिन्यांनतर घटते रोगप्रतिकार शक्ती? वाचा तज्ज्ञांचं मत

मुंबई : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही धोका कायम असल्याचे निष्कर्ष समोर येतायेत. इस्त्रायलच्या संस्थेनं केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. बुस्टर डोसची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

दोन डोस घेतले...त्यामुळे आता कोरोनाचा धोका नाही....असं जर तुम्हाला वाटत असेल तर सावध व्हा...कारण सहा महिन्यांनंतर दुसऱ्या डोसचाही प्रभाव कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. फायझर आणि कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी प्रभाव कमी होत जातो. 

इस्त्रायलच्या शेबा मेडिकल सेंटरनं हे संशोधन केलं आहे. या संशोधनात इस्त्रायलमधील पाच हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. हे संशोधन 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालं आहे. संशोधनानुसार कोव्हॅक्सिन आणि फायझर लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी अँटीबॉडीज कमी होत जातात. विशेष म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरूषांची रोग प्रतिकारशक्ती अधिक वेगानं कमी होत जाते, असंही या अभ्यासातून समोर आलं आहे. वृद्धांमधील रोगप्रतिकारशक्तीही वेगानं कमी होत असल्याचंही या अभ्यासात नमूद केलं आहे. 

बूस्टर डोसची गरज नाही

कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन सध्या बूस्टर डोसची गरज नाही असं, WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलंय. अमेरिकेनं मात्र 20 सप्टेंबरपासून सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं अमेरिकनं हा निर्णय घेतला आहे.