मुंबई : एक वेगळे ठाकरे यावेळी मैदानात उतरणार आहेत. ठाकरेंचाच वारसा चालवणारे पण टिपीकल ठाकरे नसणारे असे हे ठाकरे. आदित्य ठाकरे हे ठाकरेच.... पण थोडे वेगळे ठाकरे. कारण त्यांची बोलण्याची ठाकरी शैली नाही. उलट ते तरुणांची भाषा बोलतात. कविताही करतात. त्यांची शिवसेना रस्त्यावरची रांगडी नाही. तर त्यांची शिवसेना कॉर्पोरेट लूकमधली. वेल ऑरगनाईज्ड आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचं नवं नेतृत्व आहे.
आजपर्यंत ठाकरेंपैकी कुणी निवडणूक लढवली नाही. पण आदित्य ठाकरे इतिहास घडवणार आहेत. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. मराठवाड्यातल्या मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. विजय़ी झाल्यावर लोकांमधून निवडून गेलेले असे हे पहिले ठाकरे ठरतील.
आदित्य ठाकरे कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जातील, याची स्ट्रॅटेजी अर्थात रणनीती ठरवली ती रणनितीकार प्रशांत किशोर यांनी....आदित्य ठाकरे हा शिवसेनेचा शहरी चेहरा म्हणून ओळख आहे. आदित्य ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं ग्रामीण भागही आदित्य ठाकरेंशी कनेक्ट होणं महत्त्वाचं होतं... म्हणूनच सुरू झाली जनआशीर्वाद यात्रा.
आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रेनं तब्बल ५१४५ किलोमीटरचा प्रवास....केला. राज्यातले १११ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. १११ विजयी संकल्प मेळावे झाले. काही ठिकाणी शेतीच्या कामातही आदित्य ठाकरेंनी भाग घेतला.
मुलुखमैदान तोफ, ठाकरी बाणा असं टिपीकल ठाकरी असं काहीच आदित्य ठाकरेंकडे नाही... तरीही आदित्य ठाकरेंची आश्वासक प्रतिमा तरुणांमध्ये आहे. ही ठाकरेंची वेगळी स्टाईल आहे.