मोठी बातमी: उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.

Updated: Sep 17, 2019, 03:08 PM IST
मोठी बातमी: उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर? title=

मुंबई: काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळत आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. मात्र, ही चर्चा वैयक्तिक स्वरुपाची असल्याचा दावा उर्मिला यांनी केला आहे. परंतु, शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेच प्रवेश करू शकतात. 

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांना अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांचा प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टी यांच्यापुढे निभाव लागणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र, उर्मिला यांची राजकीय जाण अत्यंत प्रगल्भ असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर मुंबईतील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली होती. 

त्यामुळे आता उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

उर्मिला यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसला रामराम केला होता. लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते कारणीभूत असल्याची तक्रारही त्यांनी पत्राद्वारे तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. त्यांच्या टीकेचा रोख संजय निरुपम यांच्याकडे होता. मात्र, या गोपनीय पत्रातील माहिती बाहेर फुटली होती. यानंतर उर्मिला मातोंडकर काँग्रेसवर प्रचंड नाराज होत्या. अखेर याच कारणामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता.