'असली आ रहा है, नकली से सावधान' शिवसेनेची अयोध्येत पोस्टरबाजी

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्ताने शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा  

Updated: May 7, 2022, 08:11 PM IST
'असली आ रहा है, नकली से सावधान' शिवसेनेची अयोध्येत पोस्टरबाजी title=

मुंबई : अयोध्या दौऱ्यावरुन मनसे (MNS) आणि शिवसेनेत (ShivSena) आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हिंदुत्वाचा नारा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरेंचाही (Aditya Thackeray) दौरा समोर आलाय. काकांच्याआधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहेत.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. यासाठी शिवसेनेनंही जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने अयोध्येत याची पोस्टरबाजी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे पोस्टर अयोध्येत लावण्यात आले असून यावर 'असली आ रहा है, नकली से सावधन' असं लिहिण्यात आलं आहे.

शिवसेनेनं या पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा
मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे  मे महिन्याच्या शेवटी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच याची माहिती दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना टोलाही लगावला होता. 'प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. राम जन्मभूमीच्या लढ्यात शिवसेना पहिल्यापासून आहे. शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार आहे. मात्र आमचा अयोध्या दौरा राजकीय नाही. आमचा दौरा श्रद्धेसाठी आहे' असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

मनसेची जोरदार तयारी
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मनसेकडूनही अयोध्येत राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे पोस्टर लावण्यात आलं होतं. 'राज' तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या...' असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. 
अयोध्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी नियोजनात काटेकोरपणा आणला जात आहे. तसंच मनसेचं एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे सुमारे 10 ते 12 रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.