'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनावर प्रशासनाची कात्री

...यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Feb 15, 2019, 01:34 PM IST
'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनावर प्रशासनाची कात्री title=

मुंबई : बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्यात संप पुकारला होता. ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे घेण्यात आला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने कर्मचारी सुखावले. मात्र त्याचवेळी बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कात्री लावण्यात आली आहे. कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. अखेर न्यायलयाच्या मधस्थीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता.

संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून ९ दिवस वगळण्यात आले. कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पगार मिळाला. परंतु, या महिन्याचा पगार केवळ २२ दिवसांचा असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचे सुट्ट्या मंजूर करु नये, तसेच  त्यांचे वेतनही कापण्यात यावे, अशी सूचना बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांना देण्यात आली होती. त्यानुसारच हे वेतन कापण्यात आले आहे, अशी चर्चा आहे.

संपकाळातील पगार न दिल्याने कामगार कृती समिती निषेध करत असल्याची प्रतिक्रिया बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस व बेस्ट कामगार कृती समितीचे सदस्य जगनारायण कहार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या सुट्ट्या मंजूर करण्याची मागणी बेस्ट प्रशासनाकडे आधीच केलेली आहे.