मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज कोर्टाबाहेर हल्ला झाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसापासून राज्यात चर्चेत होता. राज्य सरकारने विधीमंडळात मराठी आरक्षण विधेयक बिल पास केलं पण त्यानंतर या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली. आज या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाच्या परिसरात पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यावर एका मराठा तरुणाने हल्ला केला.
सदावर्ते यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीशांकडे धाव घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपल्याला धमकी दिल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. हजारो फोनमधील एक फोन उदयनराजे यांचा असल्याचा गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप आहे. हल्ल्यानतंर गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.
एक मराठा लाख मराठाची घोषणा देत वैद्यनाथ पाटील या युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. वैद्यनाथ हा जालन्याचा राहणारा आहे. अशी माहिती त्याने दिली आहे.
आज या याचिकेवर सुनावणी होती. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारच्या मेगा भरतीलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. भरतीला स्थगिती दिल्यास इतरांचेही नुकसान होईल असं यावेळी कोर्टाने म्हटलं आहे. वैद्यकीय भरतीलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.