कोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ

 Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे. 

Updated: Sep 22, 2021, 11:55 AM IST
कोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ
संग्रहित छाया

मुंबई :  Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत 10 पेक्षा जास्त ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ( Coronavirus in Mumbai) दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गणपती उत्सवासाठी कोकणात गेलेल्या 272 जणांना कोरोना 

मुंबईतील काही भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भायखळा, नागपाडा, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम-विले पार्ले, चेंबूर, डोंगरी, गोरेगाव आणि सायन तसेच माटुंग्यात रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परळ-लालबाग, सायन-माटुंग्यात रुग्ण वाढले होते. आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

संसर्ग रोखण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई मनपाने त्रिसुत्रीचा अवलंब केला आहे. अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट, डिस्चार्ज या त्रिसुत्रीवर जोर दिला जाणार आहे. सणासुदीच्या काळात संसर्ग वाढू न देण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सव साजरा करून मुंबईत येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट अँड डिस्चार्ज’वर भर दिला आहे.

दरम्यान, एसटीचे साडेआठ हजाराहून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. एसटी महामंडळाच्या 97हजार कर्मचाऱ्यांपैकी 9हजार कर्मचारी बाधित झाले होते. 57कर्मचारी उपचार घेत आहेत. तर कोरोनाकाळात महामंडळाने 300 कर्मचारी गमावल्याचे पुढे आले आहे.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात लसीकरणाचा 18 लाखांचा टप्पा पार पडला आहे. शहरात 12 लाख 56 हजार 553 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.. तर 5 लाख 45 हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत...तर, शहरात ऐकूण 18 लाख जणांचं लसीकरण पार पडले आहे. 

साताऱ्यात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या महालसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या पहिल्या दिवशी 2 हजार 389 नागरिकांना लस देण्यात आली. सातारा शहरात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेनं कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पालिकेला लसींचे आठ हजार डोस उपलब्ध करण्यात आलेत.