मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांकडे मतदार संघातील काही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याची माहिती खडसेंनी दिली. मात्र, सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्यात. पक्षात डावललं जात असल्यानं खडसे व्यथित झालेत.
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे काल दिल्लीला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यामागे भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या नाराजीची पार्श्वभूमी आहे. गेल्या आठवड्यात पंकजा मुंडेंची भेट घेऊन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी 'ओबीसी नेत्यांना डावललं जातंय' अशी आपल्या मनातली अनेक दिवसांची खदखद व्यक्त केली. शनिवारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतरही कटुता कमी झाली नव्हती.
खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या भेटीगाठी वाढत चालल्यात. या नेत्यांनी भाजपपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतलाच, तर त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी महाविकासआघाडीत चढाओढ दिसतेय.
भाजप नेते मात्र खडसे आमचेच असं सांगतायत. रोहिणी खडसेंच्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांची तक्रार केंद्रीय नेतृत्वाला करण्यासाठी ते दिल्लीत गेले होते. मात्र तिथं केवळ शरद पवारांशी अर्धा तास चर्चा करून ते मुंबईला रवाना झाले... आणि आज ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. एकाही भाजप नेत्याला भेटले नाहीत. आता खडसे काय निर्णय घेतात आणि गोपीनाथ गडावर होणाऱ्या पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात काय घडतं? यावर नजरा असतील.