मुंबई : पुणे येथील ससून रुग्णालय आणि बी. जे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची यांची येथील सर जे. जे. रुग्णालय आणि ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. डॉ. चंदनवाले हे ससूनमध्ये १३ मे २०११पासून अधिष्ठाता पदावर कार्यरत होते.
सर जे. जे. रुग्णालयाचे डीन डॉ. एस. नानंदकर यांची कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बदली करण्यात आली आहे. जे. जे. हॉस्पिटलचे नवीन डीन पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉ. अजय चंदनवाले असतील, अशी माहिती डीएमईआरचे प्रमुख डॉ. प्रवीण शिंगारे यांनी दिले. डॉ. चंदनवाले यांनी मागील सात वर्षांच्या कारकीर्दीत ससून रुग्णालयाला नवी ओळख करुन दिली. रुग्णालयाचे रुपडे पालटले आहे. दरम्यान, निधीच्या कमतरतेमुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी अध्यापक, डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांच्या टीम्स तयार केल्या. तसेच ‘सीएसआर’च्या माध्यमातून तब्बल ८५ कोटीहून अधिक निधी उभा करून रुग्णालयाला अत्याधुनिक स्वरूप दिले.
डॉ. चंदनवाले यांनी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली. लवकरच हृदय प्रत्यारोपणासाठीही मान्यता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात अद्याप एकाही शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्यारोपणाची सुविधा नाही. अवयदानामध्ये ससून रुग्णालय आघाडीवर आहे. याआधी बराच काळ डॉ. तात्यासाहेब लहाने हे जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी होते. त्यांना पदोन्नती देण्यात आली.