अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद

Updated: Nov 26, 2019, 12:43 PM IST
अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती title=

मुंबई : अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीचे मार्ग बंद झाले आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप सरकारला उद्याच बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. यासाठीची रणनिती ठरवण्यासाठी अजित पवार हे भाजपच्या बैठकीला पोहोचले आहेत. गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, पण याला यश आलेलं नाही. आता अजित पवारांनी भाजपच्या बैठकीलाच हजेरी लावल्यामुळे अजित पवारांचा निर्णय अंतिम आहे, हे निश्चित झालं आहे.

अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल आणि ५ वाजता हा कार्यक्रम संपेल. ५ वाजता हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेईल. ही चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणात ही चाचणी होणार आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तर फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

२३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते असताना अजित पवारांनी त्यांच्या आमदारांच्या भाजपच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना दिलं. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ माजली. यानंतर शरद पवार यांनीही ही अजित पवारांची वैयक्तिक भूमिका आहे, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, असं स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना गटनेतेपदावरून काढून टाकून त्यांच्याऐवजी जयंत पाटील यांचीही निवड केली.