"...म्हणून अजित पवार यांनी हा निर्णय घेतला"; उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा एकदा  राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला आहे.

Updated: Jul 2, 2023, 02:49 PM IST
"...म्हणून अजित पवार यांनी हा निर्णय घेतला"; उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती title=

Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. रविवार सकाळपासून अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याचे नक्की झालं आहे. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीच याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

"अजित पवार हे देखील प्रशासनात चांगले काम करणारे नेतृत्व आहे. ज्या पद्धतीने अडीच वर्षे महाराष्ट्राचा कारभार झाला त्याच्याबाबतची माहिती अजित पवार यांना होती. प्रशासना बरोबर राहावं यासाठी अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला असावा. आज फक्त राष्ट्रवादीचे नऊ आमदार शपथ घेतील, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळेंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अजित पवार आमदारांसह शपथविधी समारंभात पोहोचले. शरद पवारांचा पाठिंबा नाही अशी माहिती मिळत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील जवळपास सर्व आमदार अजित पवारांसोबत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडल्याचे समोर आले आहे.

अजित पवार यांचे अभिनंदन - चंद्रशेखर बावनकुळे

या राजकीय भूकंपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि हे आमदार सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं म्हटलं आहे. "याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि ४० पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.