राज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी पैशांची उधळपट्टी

राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: May 13, 2021, 02:30 PM IST
राज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी पैशांची उधळपट्टी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना परिस्थितीत राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असताना सरकार मंत्र्यांच्या सोशल मीडियावर खर्च करण्यासाठी पैसे खर्च करणार आहे.  राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी खाजगी एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचावेत याची जबाबदारीही या एजन्सीवर असणार आहे. 

ही एजन्सी अजित पवारांचं ट्विटर हॅण्डल, फेसबुक, ब्लॉग, युट्यूब, इन्स्टाग्राम अकाऊंट्स, साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअॅप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल आणि एसएमएस या जबाबदाऱ्या सांभाळणार आहे.

अजित पवारांचं सचिवालय आणि माहिती आणि डीजीआयपीआर यांच्यात चर्चा केल्यानंतर एजन्सीची निवड केली जाणार आहे.

डीजीआयपीआरकडे सोशल मीडियासाठी व्यवसायिक आणि तांत्रिक क्षमतेची कमतरता असल्याने खाजगी एजन्सीकडे हे काम दिलं जाणार आहे.