Maharashtra Politics : राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्या घरातच आता बंडाळी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंड करणार अशी चर्चा आहे. मात्र, गेल्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्रानं आणि जगातील 33 देशांनी एक बंड पाहिलं अर्थात हे बंड होतं ते एकनाथ शिंदे यांचे. अत्यंत मितभाषी असणा-या एकनाथ शिंदेंनी बंड केले. आता याच बंडाचा सिक्वेल पहायला मिळणार आहे. या बंडाचा प्रमुख चेहरा असणार आहे तो अजित पवार यांचा
विधानपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात असा जल्लोष सुरू झाला. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचे प्रसाद लाड अनपेक्षितरित्या विजयी झाले. तर, महाविकास आघाडीचं सरकार असतानाही काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या फ्लोअर मॅनेजमेंटमुळं भाजपनं महाविकास आघाडीची जिरवली. नेमकी कुणाची मतं फुटली? काँग्रेसची की शिवसेनेची? याचा शोध सुरू झाला आणि त्याचवेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटला.
21 जून 2022 ची सकाळ उजाडलीच तीच राज्याला हादरवून सोडणा-या बातमीनं. शिवसेनेचे हेविवेट मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. काही आमदारांसह शिंदे गुजरातला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. विधानपरिषद निवडणुकीच्या प्लॅनिंगमधून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना बाजूला ठेवलं होते. हा अपमान हीच उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली आणि शिंदेंनी ठाकरेंना कायमचा जय महाराष्ट्र केला.
दुपार होईपर्यंत एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांसह सुरतला गेल्याचं कन्फर्म झालं होतं. शिंदेंसोबत 12-13 आमदार रात्रीच्या रात्री सूरतला पोहचले होते. फक्त ठाकरे नाही तर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनाही हादरवून टाकणारी ही घडामोड होती. शिंदेंनी बंड केल्याची खात्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीनं शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अर्थातच शिंदे समर्थक गैरहजर होते, त्याच दिवशी संध्याकाळी शिंदेंची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
शिवसेनेत आणखी फूट पडू नये, यासाठी उर्वरित आमदारांनी मुंबई सोडून जाऊ नये, असे फर्मान उद्धव ठाकरेंनी काढलं. मुंबईतील हॉटेल्समध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. तर दुसरीकडं एकनाथ शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर शिंदेंनी ठाकरेंना दिली. शिंदेंची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीचे सर्वात खासमखास दूत मिलिंद नार्वेकर यांना तातडीनं सूरतला रवाना करण्यात आलं. ठाणेकर रवींद्र फाटकही त्यांच्यासोबत होते. पण, शिंदेंनी परतीचे दोर कापले होते. मातोश्रीचे दूत हात हलवत मुंबईला परतले.
उद्धव ठाकरेंचं फर्मान धुडकावून आणखी काही शिवसेना आमदार सूरतला बंडखोरांच्या गटात दाखल झाले. कालपर्यंत ठाकरेंसोबत वर्षावर असलेले गुलाबराव पाटील आणि उदय सामंत शिंदे कॅम्पमध्ये सामील झाले. सकाळी ठाकरेंसोबत दिसणारे आमदार रात्रीपर्यंत शिंदे गटात सामील होत असल्याचं चित्र पुढचे दोन दिवस सुरूच होतं. शिंदे गटातल्या आमदारांची संख्या वाढल्यानं शिंदेंनी समर्कांसह मुक्काम गुवाहाटीला हलवला.
गुवाहाटीपासून जो राजकीय संघर्ष राज्याच्या पटलावर सुरु झालं ते आपण सर्वांनी पाहिलं.. गुवाहाटीतून मुंबईत येईपर्यंत शिंदे केवळ एक बंडखोर आमदार होते. मात्र फडणवीसांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि राज्यात राजकीय भूकंपाचा तीव्र झटका बसला.
कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल की ठाण्याचे एक आमदार इतकीच ओळख असणारे एकनाथ शिंदे शिवसेनेतील 40 आमदार फोडून मुख्यमंत्री होतील.. 2019 पासून 2023 पर्यंत महाराष्ट्र रोज राजकीय ड्रामा पाहतोय. तरीही या राजकीय ड्रामेबाजीत शिंदेंचं बंड आजपर्यंतचं राज्यातलं सर्वात मोठं राजकीय बंड ठरलं. मात्र यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात आता काहीही होऊ शकतं हे जनतेलाही पटलं आहे.