चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ: बदलापूर (Badlapur News) येथे अल्पवयीन शालेय चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणामुळं झालेले आघात अद्याप भरून निघालेले नसतानाच अशाच एका घटनेनं आता अंबरनाथ (Ambarnath News) परिसर हादरला आहे. ज्यामुळं आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत असून, कायदा आणखी कठोर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
अंबरनाथमध्ये राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. मुलगी रिक्षात बसताच त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेलं आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला. या धककादायक घटनेबाबत मुलीने पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी तताडीनं कारवाई करत त्या रिक्षा चालकालाही बेड्या ठोकल्या. सध्या या नराधमाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.