चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. आरोपींनी बनाव रचत पोलिसांना (Ambernath Police) गुंगारा देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींनी अटक केली आहे. तर एकाच पोलीस शोध घेत आहे. आरोपींनी एका व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी कट रचला होता. मात्र कट रचणाऱ्याच्याच मित्र त्यात अडकल्याने आरोपीचा डाव फसला. आरोपींनी पोलिसांना खोटी माहिती देऊन फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासामध्ये पोलिसांना खरी माहिती कळाली. पोलिसांनी आरोपी विरोधात कट रचण्यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत ढाबा परिसरात 15 जुलैच्या दुपारी दीड वाजता आलोक आणि त्याचे काही मित्र या ठिकाणी एकत्र आले होते. विवेक नायडूचा बदला घेण्यासाठी आलोक यादव,चंदन भदोरिया आणि रोहितसिंग पुना हे तिघेही विवेक नायडूच्या हत्येचा कट रचण्यासाठी हे कल्याणवरुन बदलापूर याठिकाणी आले होते. कारण विवेक नायडू याने काही दिवसांपूर्वी चंदन याच्या भावावर कल्याणच्या काळा तलाव या ठिकाणी गोळीबार केला होता. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक हा फरार झाला होता. भावावर गोळीबार झाल्याचा बदला घेण्यासाठी चंदनने मित्रांसह अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत धाबा जवळ एकत्र येत विवेकला संपवण्याचा कट रचला.
हे सर्वजण बुलेट आणि पल्सर मोटरसायकलवरून कल्याणला जात होते. दरम्यान अंबरनाथच्या गणपत धाबा समोर आतिश पवार आणि त्याचा मित्र आरोपींना भेटला. आतिशसोबत चंदन याची बाचाबाची झाली. त्यावेळी चंदन भदोरियाने जवळ असलेल्या गावठी कट्टा काढून विवेक नायडू बद्दल माहिती दे नाहीतर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. वाद सुरु असतानाच चंदनच्या पिस्तुलातून गोळी सुटली. मात्र ती चंदनचा मित्र आलोकच्याच उजव्या मांडीत घुसली. हा सर्व प्रकार बघून आतिश आणि त्याचा मित्र तिथून पळून गेला.
त्यानंतर चंदन भदोरिया आणि रोहित सिंग पूना यांनी जखमी आलोकला उल्हासनगरच्या मॅक्स लाइफ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या प्रकरणाची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकार लक्षात घेत गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांना माहिती देताना चंदन आणि त्याच्या साथीदाराने खोटा बनाव करत आलोकवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे असे सांगितले. मात्र पोलिसांना हे प्रकरण खोटं असल्याचं समजलं. त्यानंतर एका एका आरोपीची चौकशी केल्यानंतर खरं प्रकरण समोर आलं.
यामध्ये जखमी आरोपी आलोक यादव, रोहित सिंग पुना आणि मुख्य आरोपी चंदन भदोरिया या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस आणि गुन्हात वापरलेल्या मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
"शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आलोक आणि त्याचे साथीदार त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी गेले होते. त्याठिकाणीहून येत असताना त्याला एकजण भेटला . त्याच्यासोबत आलोकची बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी चंदन भदोरिया हा गावठी कट्ट्याने तरुणाला धमकावत असताना त्यातून गोळी सुटली. आलोकला मांडीमध्ये ती गोळी लागली. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी खोटा बनाव तयार केला होता. पोलिसांनी बारकाईने चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. विक्की नायडूसोबत आरोपींचे भांडण आहे. त्याच्या शोधात हे लोक फिरत होते. त्याच्या मित्राला शोधत असताना त्यांनी तरुणाला धमकावले," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.