'फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही'

अमृता फडणवीस यांचा ट्विटद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Updated: Dec 23, 2019, 08:51 AM IST
'फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही' title=

मुंबई : सत्तेच्या संसाराचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना भाजप संबंध ताणलेले आहेत. त्यात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यात उडी घेतली आहे. "फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही", असा थेट हल्लाबोलच अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे केलं आहे. अमृता फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. 

 आपण सावरकर नाही असं विधान राहुल गांधींनी नुकतंच केलं होतं. त्याला देवेंद्र फडणवीसांनी १४ डिसेंबरला ट्विटद्वारे उत्तर दिलं होतं. त्यांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी रविवारी रिट्विट करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. 

फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही, असा सणसणीत टोला लागवत त्यांनी पुढे म्हटलं आहे की, एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला असल्याची चर्चा आहे. तर, सावरकरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमृता यांनी प्रश्न उभे केले असल्याची चर्चा आहे.