अंधेरी दुर्घटना : महापालिका आणि रेल्वे प्रशासनात 'ब्लेम गेम'

या ढकलाढकलीत मात्र मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.

Updated: Jul 3, 2018, 01:18 PM IST
अंधेरी दुर्घटना : महापालिका आणि रेल्वे प्रशासनात 'ब्लेम गेम' title=

मुंबई : मुंबईतल्या अंधेरीतल्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलीय.  पूल रेल्वेचा असल्याचा महापालिकेचा दावा पश्चिम रेल्वेनं फेटाळून लावलाय. अंधेरीचा कोसळलेला पूल हा रोड ओव्हर ब्रिज आहे. रोड ओव्हर ब्रीज हा महानगर पालिकेच्या आखत्यारीतच येतो, तरीही या सगळ्याची रेल्वेचे सेफ्टी आयुक्त चौकशी करतील... त्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलंय. 

अधिक वाचा - 'कोसळलेल्या गोखले पुलाची जबाबदारी रेल्वेची... पालिकेची नाही'

तर दुसरीकडे पूल रेल्वेचाच असून त्याच्या डागडुजीसाठीचा निधी रेल्वेला दिल्याचा दावा महापौर महाडेश्वर यांनी केला होता. 'गोखले पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हतीच... डागडुजीसाठी पालिका पैसे देते... ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली होती. सोबतच, पुलाची डागडुजी व्यवस्थित झाली नाही, असा आरोपही महाडेश्वर यांनी केलाय.

अधिक वाचा - अंधेरी दुर्घटना : मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली

पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या या ढकलाढकलीत मात्र मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. दरम्यान, अंधेरीतल्या कोसळलेल्या पुलाची रेल्वेकडून याआधी तपासणी झाली होती का? रेल्वेनं या पुलाबाबत काही उपाययोजना केल्या होत्या का? याची चौकशी रेल्वेकडून होणं गरजेचं असल्याचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय.