चौकशीसाठी ईडी समोर कधी येणार? अनिल देशमुख यांनी केला खुलासा

काही जण आपल्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे

Updated: Jul 19, 2021, 07:50 PM IST
चौकशीसाठी ईडी समोर कधी येणार? अनिल देशमुख यांनी केला खुलासा  title=

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आलेलं आहे. गेल्या आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले होते. आता अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तसंच काही जण आपल्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.

'ईडीने आपल्या कुटुंबाची अंदाजे 4 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात आपला मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये घेतलेल्या 2 कोटी 67 लाखांच्या जमिनीचाही समावेश आहे. मात्र काही वर्तमानपत्रांत 2006 मध्ये घेतलेली 2 कोटी 68 लाखांची जमीन तिनशे कोटींची सांगण्यात आली आहे. आणि ईडीने आपली तिनशे कोटींची जमीन जप्त केल्याचा गैरसमज पसरवण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला. तसंच आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल, त्यानतंर मी स्वत: ईडीसमोर माझं म्हणणं मांडायला जाणार आहे, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. 

अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. तर रायगड जिल्ह्यातील 2 कोटी 67 लाखांची जमीनही जप्त करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा इथल्या निवासस्थानीही ईडीने छापा टाकला.