अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्या भेटीत काय झालं ?

अनिल देशमुख यांचा राजीनामा

Updated: Apr 5, 2021, 03:21 PM IST
अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्या भेटीत काय झालं ? title=

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सोपावला आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याची माहिती समोर येतेय. गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला गेले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. राजीनामा देण्यापुर्वी अनिल देशमुख यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100  कोटीच्या खंडणीचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. त्यानंतर काहीवेळातच अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली. 

राजीनामा देण्यापुर्वी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीदरम्यान शरद पवारांनी देशमुखांना राजीनाम्यासाठी होकार दिला अशी माहिती समोर येतेय.

गृहमंत्रीपद कोणाकडे ?

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री पद कोणाकडे असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मुख्यमंत्री स्वत:कडे हे खातं ठेवणार असल्याचे सुरुवातीला वृत्त आले. पण दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.