किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; म्हाडाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अनिल परब यांचा इशारा

अनिल परब यांच्या वांद्रे पूर्व भागातील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर मंगळवारी किरीट सोमय्या तिथे पाहणी करण्यासाठी जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना अडवण्यात आले. यानंतर सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Updated: Jan 31, 2023, 05:58 PM IST
किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; म्हाडाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अनिल परब यांचा इशारा

Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (bjp Leader kirit somaiya) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मंगळवारी हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी वांद्रेतील म्हाडा सोसायटीतील कार्यालय हटवल्यानंतर थेट म्हाडा कार्यालय (Mhada Office) गाठलं. शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या सुरू केला. यावेळी अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. तीन तासांच्या बैठकीनंतर अनिल परब यांनी म्हाडा कार्यालयाच्या बाहेर येत किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे.

"गेली दीड वर्ष माझ्यावर किरीट सोमय्या आरोप करुन ते माझे कार्यालय असल्याचे सांगत होते. पण मी वारंवार सांगत होतो की ही जागा माझी नाही. ही जागा सोसायटीची आहे आणि ती वापरण्याची परवानगी त्यांनी मला दिली होती. किरीट सोमय्या जे आरोप करत होते ते खोटे असल्याचे म्हाडाने मला लेखी स्वरुपात दिले आहे. किरीट सोमय्या खोटे बोलत असल्याचा पुरावा म्हाडाने दिला आहे. अनिल परब यांच्या नावे जारी केलेली नोटीस मागे घेण्यात आल्याचे म्हाडाने म्हटले आहे. किरीट सोमय्या मला बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून आरोप करत आहेत. त्यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत," असे अनिल परब म्हणाले.

"मूळ बांधकामाचे नकाशे मला आठ दिवसात मिळाले नाहीत तर म्हाडावर मी हक्कभंगाचा दावा दाखल करणार. त्रास देण्यासाठी म्हाडा अधिकारी नोटीस पाठवत असल्याने याबाबत मी कोर्टात जाईन. बांधकाम हटवण्याचे काम सुरु असतानाही मला नोटीस पाठवण्यात आली. मी याविरोधात हायकोर्टात जाणार आहे. कोणतीही शाहनिशा न करता अधिकाऱ्यांनी मला खोटी नोटीस दिली. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे," असेही अनिल परब म्हणाले.

किरीट सोमय्यांना 100 कोटी द्यावे लागतील - अनिल परब

"माझे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे झालेले नाही. त्यांना माहिती आहे काही चुकीचे काम करणार नाही. मला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. मी किरीट सोमय्या यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकलेलाच आहे. त्यामध्ये आज मला कायदेशीर पुरावा मिळाला आहे. त्यामुळे आता हा पूरावा किरीट सोमय्या यांना नाक घासायला लावणार आहे. अशाच प्रकारे आणखी पुरावे येतील तेव्हा किरीट सोमय्या यांना नाक घासावे लागेल आणि 100 कोटी द्यावे लागतील," असेही अनिल परब म्हणाले.