मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे की अर्जुन खोतकर लढणार, हा पेच अजूनही कायम आहे. यासंदर्भात अर्जुन खोतकर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वत:ची बाजू मांडली. यापूर्वी खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली होती. दरम्यान, उद्धव यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत शिवसेना जालन्याची जागा जिंकू शकते, असा दावा खोतकर यांनी केला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादेत होणाऱ्या युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे कुणीही आपल्या संपर्कात नसल्याचेही खोतकरांनी स्पष्ट केले. मात्र, खोतकरांना उमेदवारी द्यायची झाल्यास देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवेंचे मन कसे वळवणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
रावसाहेब दानवे जालन्याचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी त्यांच्याशी लढण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, युती झाल्यानंतर या मतदारसंघातून दानवे यांनाच उमेदवारी मिळणार, हे जवळपास स्पष्ट होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या काळात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. परिणामी अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळेच अर्जुन खोतकर यांनी वेळ पडल्यास आपण शिवसेनेतून बाहेर पडून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवू, असा ठाम पवित्रा घेतला आहे.