close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दीड महिना रिक्त

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही २५ मे रोजी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता

Updated: Jul 10, 2019, 04:34 PM IST
चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दीड महिना रिक्त

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दीड महिना उलटला तरी या पदावर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. सध्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणच पक्षाचे कामकाज पाहत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षाला पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्ष नसल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती कधी होणार? अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही २५ मे रोजी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून मागील दीड महिना राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद रिक्त आहे. दोन आठवड्यांपूर्वी या पदावर बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती होईल, अशी शक्यता होती. मात्र, काँग्रेसमधील गोंधळामुळे त्यांची नियुक्ती रखडली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष नाही, अशी राज्यातील काँग्रेसची स्थिती आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष नसले तरी पक्षाचे काम योग्य रितीने सुरू असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. काँग्रेसच्या निवडणूक तयारीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र तरीही प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याच्या कोणत्याच हालचाली दिल्ली पातळीवर दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेस नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करणार की अशोक चव्हाण यांच्याकडेच या पदाची सूत्र कायम राहणार, याबाबत पक्षात चर्चा सुरू झाली आहे.