कोण होणार मुख्यमंत्री? भाजप-शिवसेनेत निवडणुकीआधीच रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

Updated: Oct 10, 2019, 07:47 PM IST
कोण होणार मुख्यमंत्री? भाजप-शिवसेनेत निवडणुकीआधीच रस्सीखेच title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्याची झलक पाहायला मिळत आहे. कौन बनेगा मुख्यमंत्रीचा खेळ सुरू झाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार चुरस रंगणार आहे. आणि ही स्पर्धा असणार आहे ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी. भाजपाने आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या शिरावर मुख्यमंत्रिपदाचा ताज ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपा अध्यक्ष अमित शाहांपर्यंत सर्वांनीच मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही चमत्कार घडवण्याची भाषा सुरू केली आहे. आमचा नेता ठरलाय, असंही ते सांगत आहेत. आता उद्धव ठाकरेंनी ठरवलेला नेता कोण?, हे न कळायला जनता काही दुधखुळी नाही. हीच ती वेळ म्हणत शिवसेनेने आदित्यला मुख्यमंत्री बनवण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे मी परत येईन म्हणत देवेंद्र फडणवीसही रिंगणात उतरलेत. आता यांच्यापैकी कोण बाजी मारणार? घोडामैदान फार दूर नाही? २४ ऑक्टोबरला याचा फैसला होणार आहे.