देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. प्रत्येक उमेदवार मतदार राजापर्यंत पोहचण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळतोय भायखळा या मतदार संघात देखील हेच चित्र आहे. यंदा या मतदार संघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
भायखळा हा दक्षिण मुंबईतला एक महत्वाचा मतदारसंघ आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एमआयएम कडून विद्यमान आमदार वारीस पठाण, शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव, काँग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण तर अखिल भारतीय सेनेकडून नगरसेविका गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 ला एमआयएमला या मतदार संघात लॉटरी लागली आणि वारीस पठाण निवडून आले. मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे वारीस पठाण यांना ही निवडणूक सोपी असणार नाही. शिवसेनेने या मतदार संघात चांगलाच जोर लावला आहे.
या विधानसभा मतदार संघातून रिंगणात असलेले काँग्रेस उमेदवार मधू चव्हाण हे याच मतदार संघातील माजी आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात रखडलेली विकास कामांमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा मधू चव्हाण यांचा दावा आहे. तर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि उमेदवार गीता गवळी बदल घडवण्यासाठी मैदानात उतरल्याच सांगितल आहे. जनता आपल्याच साथ देईल असा विश्वास त्यांना आहे.
जुन्या चाळी, जुन्या इमारती यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न या मतदार संघात आहे. मुस्लिम आणि मराठी मतदारांची संख्या या विभागात मोठी आहे. हे मतदार या विभागातील निर्णायक मतदार आहेत. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा या मतदार संघात प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळेच खरा सामना हा एमआयएम आणि शिवसेनेत रंगणार असा अंदाज स्थानिकांचा आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारत हे 24 तारखेला स्पष्ट होईल.