मुंबई : महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून एकमताने बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. थोरात काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून बाळासाहेब थोरांतांची निवड केली.
काही दिवसांपूर्वी आमदारांची सोनिया गांधींसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत सोनिया गांधींनी बाळासाहेब थोरांतांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर बाळासाहेब थोरातांचा मुख्यमंत्रिपदासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल आणि ५ वाजता हा कार्यक्रम संपेल. ५ वाजता हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेईल. ही चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणात ही चाचणी होणार आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तर फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.