बेस्ट संप : उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना चपराक तर मुंबई पालिकेला खडसावले

बेस्ट संप मिटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. 

Updated: Jan 11, 2019, 05:21 PM IST
बेस्ट संप : उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना चपराक तर मुंबई पालिकेला खडसावले

मुंबई : बेस्ट संप मिटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. बेस्ट कृती समिती, मुख्य सचिव, महापालिका आयुक्त यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, संपावर तोडगा न निघाल्याने मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. दरम्यान, संप आज मिटला नाही तर मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच मनपा कर्मचारीही संपात उतरणार आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी तसा इशाराही दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्याबाबत प्रयत्न होत असताना संपकऱ्यांच्या मागण्याचा विचार होत नसल्याने हा तिढा कायम आहे.  संपात वीज कर्मचाऱ्यांचाही सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपाला वाढता पाठिंबा मिळत आहे. 

मुख्यमंत्री करणार मध्यस्थी

दरम्यान, बेस्टच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सकाळी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर मध्यस्थी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या चर्चेचत मुख्यमंत्र्यांनी बेस्टचा संप  मिटवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंना दिले आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी तरी बेस्टचा संप मिटणार अशी आशा मुंबईकरांना आहे. 

मुंबई मनपाला खडसावले 

बेस्टच्या संपाप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. लागोपाठ चौथ्या दिवशीही संप सुरू ठेवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे 'मुंबई मनपाने पर्यायी व्यवस्था का केली नाही? असा सवाल करत उच्च न्यायालयाने मुंबई मनपाला खडसावले आहे. संप करण्याआधी न्यायालयाकडे का आला नाहीत? आम्ही याहून अधिक तांत्रिक खटले सोडवतो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी खडसावले आहे.

पूर्वसूचना देऊन संपावर - बेस्ट कर्मचारी

तर पूर्वसूचना देऊन संपावर गेल्याचा दावा संपकरी युनियनच्या वकिलांनी यावेळी केला. कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नफ्यात चालत नाही. त्यामुळे सबसिडी द्यावीच लागते, असा युक्तिवाद संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलाने न्यायालयात केला. तर सुधारित पर्यायी व्यवस्था पालिकेने प्रस्तावित केली तर बेस्टकडून विरोध होतो. मग सुधारणा कशा करायच्या? असा सवाल मुंबई महापालिकेच्या वकिलाने विचारला.

वीज कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा

उद्धव ठाकऱ्यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्यामुळे बेस्ट संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. बेस्टच्या वीज पुरवठा संघटनेचे कर्मचारीही या संपात आजपासून उतरले आहेत. तब्बल ६००० वीज कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिलाय. त्य़ामुळे आज मुंबई अंधारात बुडण्याची भीती आहे. त्यातच आता आज या संपाबाबत तोडगा निघाला नाही तर मनपा कर्मचाऱ्यांनीही संपात उडी घेण्याचा निर्णय घेतलाय. मनपाचे चतुर्थ श्रेणी कामगार या संपात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची भीती आहे.