बेस्ट प्रवास करताय, ही कागदपत्रे आहेत का? अन्यथा भरावा लागेल दंड

अधिकाऱ्यांकडून तपासणी सत्र सुरु

Updated: Jan 6, 2022, 10:13 PM IST
बेस्ट प्रवास करताय, ही कागदपत्रे आहेत का? अन्यथा भरावा लागेल दंड title=

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली. मात्र, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत अशांना बेस्ट बसचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, आता बस प्रवास करणे सोपे राहिलं नाही. 

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यातच काल बेस्टमधील 66 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील केवळ सहा जणांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. प्रवासी वाहतूक करताना या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर येताच बेस्ट प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

ज्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डॉस पूर्ण झाले आहेत अशा प्रवाशानाच बसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही प्रवाशी लसीचे प्रमाणपत्र किंवा युनिवर्सल पास न दाखविता प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बेस्ट अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे लस प्रमाणपत्र किंवा युनिवर्सल पास आहे कि नाही याची हे अधिकारी तपासणी करत आहेत. ज्या प्रवाशांकडे ही प्रमाणपत्रे नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.