भीमा कोरेगाव हिंसाचारचे पडसाद, चेंबूरमध्ये रेल रोको

कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरासह मुंबईतही उमटत आहेत. 

Updated: Jan 2, 2018, 04:05 PM IST
भीमा कोरेगाव हिंसाचारचे पडसाद, चेंबूरमध्ये रेल रोको title=

मुंबई : कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरासह मुंबईतही उमटत आहेत. काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केला असून यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला.

चेंबूर नाक्यावर सकाळपासून चक्का जाम केल्यामुळे चेंबूर ते सायन दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग व भांडुप गावातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. जागोजागी गटागटाने गर्दी, तणावपूर्ण शांतता आहे.

आज सकाळी काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. पण अजूनही रेल्वे सेवा सुरळीत झालेली नाही.