भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.

Updated: May 31, 2019, 02:36 PM IST
भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण title=

मुंबई: मोदी सरकारच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. यंदा शिवसेनेच्या वाट्याला चांगले खाते येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेच्या गळ्यात मारले आहे. केंद्रातील इतर खात्यांच्या तुलनेत अवजड उद्योग मंत्रालय कमी प्रतिष्ठेचे मानले जाते.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते. शिवसेनेने याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले होते. याची परिणिती युती तुटण्यात झाली होती. 

शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद द्यायला हवे होते- संजय राऊत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवेळी भाजपच्या नेतृत्त्वाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. यंदा शिवसेनेला सत्तेत चांगला वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज जाहीर झालेल्या खातेवाटपानंतर सेनेच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं

तत्पूर्वी गुरुवारी मंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेची नाराजी समोर आली होती. शिवसेनेकडून भाजपसमोर तीन मंत्रिपदे, राज्यपाल पद आणि उपसभापती अशा पाच पदांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अरविंद सावंत यांच्या रुपाने शिवसेनेला एकच मंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेला किमान आणखी एक मंत्रीपद मिळायला हवे, अशी खंतही बोलून दाखवली होती.