सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारोहात शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान दिलं गेलं होतं. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सभागृहात एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांना या समारोहात पाचवं स्थान दिलं गेलं, ते अपमानकारक आहे, ही वागणूक चुकीची आहे. पवारांना पाचव्या रांगेत स्थान देणे क्लेशदायक आहे', असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
'शरद पवारांनी देशासाठी जे विविध क्षेत्रात योगदान दिलं आहे, त्यांचा निश्चितच मान राखला गेला पाहिजे', असं देखील यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात पक्ष विलिनीकरणाविषयी कोणतीही चर्चा झाली असेल, असं मला वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच याविषयी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आमच्यापुढे विधानसभा निवडणुकीचं आव्हान असल्याने, त्या दृष्टीकोनाने आम्हाला बांधणी करावी लागणार असल्याचं देखील यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.