Maharashtra Politics : राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील अनेक राज्यांमध्ये पीएफआय (Popular Front of India) विरोधात कारवाई केली. या कारवाईविरोधात पीएफआयतर्फे (PFI) अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. पुण्यातही पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण या आंदोलन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याविरोधात आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पोलिासांनी पीएफआयच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका
दरम्यान पीएफआय प्रकरणावरुन भाजपने (BJP) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे. भाजप नेते आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलय, पीएफआयचा देशविरोधी कट उघड झालाय, पुण्या तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या, सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करणारे, उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
इतिहासातील खानांची सदैव "उचकी" लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले, संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे "होर्डिंग" लावणारे आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत... आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत!
आता कुठल्या बिळात बसला आहात? असं ट्विट करत शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.
पुण्यात युवासेनेचं आंदोलन
दरम्यान, पुण्यात युवासेनेनं (Yuvasena) पाकिस्तान मूर्दाबादच्या घोषणा देत त्यांचा झेंडाही फाडून टाकला. गेल्या शुक्रवारी पुणे कलेक्टर ऑफिस समोर पीएफआयने केलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्याचं बोललं जातंय त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी युवासेनेनं आज त्याच ठिकाणी आंदोलन करत पाकिस्तानी झेंडाही फाडला.
पुण्यात मनसे आक्रमक
पुण्यामध्ये पीएफआयविरोधात मनसे (MNS) आक्रमक झाली असून, पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. पीएफआयवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून, पुण्यातील अलका टॉकिजम चौकात मनसेनं हे आंदोलन केलं.. या आंदोलनादरम्याम पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच PFIवरबंदी आणावी आणि घोषणाबाजी करणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली.
पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.