भाजपच्या भुजबळ प्रेमाला भरती... काय आहे हे गौडबंगाल?

गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात खितपत पडलेल्या छगन भुजबळांसाठी भाजपला प्रेमाचा पाझर फुटलाय... केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर केंद्रीय मंत्री देखील भुजबळांच्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत... हे भुजबळ प्रेम अचानक का उफाळून आलंय? 

Updated: Nov 29, 2017, 09:15 AM IST
भाजपच्या भुजबळ प्रेमाला भरती... काय आहे हे गौडबंगाल? title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात खितपत पडलेल्या छगन भुजबळांसाठी भाजपला प्रेमाचा पाझर फुटलाय... केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर केंद्रीय मंत्री देखील भुजबळांच्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत... हे भुजबळ प्रेम अचानक का उफाळून आलंय? 

...अन् प्रेमाला फुटला पान्हा

छगन भुजबळ... महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व... शिवसेनेतून राष्ट्रवादीपर्यंत आणि महापौरपदापासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेणारे राजकीय नेते... मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते तुरूंगात खितपत पडलेत. मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याखाली अंमलबजावणी संचालनालयानं मार्च २०१६ पासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक करून तुरुंगात टाकलंय... दीड वर्षं उलटली, पण भुजबळ काका-पुतण्यांना अजून जामीन मिळत नाहीय... अशा भुजबळांसाठी भाजपला अचानक प्रेमाचा पान्हा फुटलाय.

भुजबळांचं मंत्र्यांकडून कौतुक

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं डॉ. मा. गो. माळी यांना पुण्यात समता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी भुजबळांसारखा लढवय्या नेता तुरूंगातून बाहेर यायला हवा, असं धक्कादायक वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलं. दिलीप कांबळेच नाहीत, तर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनीही यावेळी भुजबळांचं कौतुक केलं.
 
उल्लेखनीय बाब म्हणजे, सत्ताधारी पक्षाचे मंत्री भुजबळांच्या सुटकेची आशा व्यक्त करत असताना, शरद पवारांनी मात्र त्याबाबत चकार शब्द उच्चारला नाही. 

काय आहे गौडबंगाल?

ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे भुजबळ... एकेकाळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीच त्यांच्याविरोधात रान उठवलं होतं. आता त्याच भाजपच्या मंत्र्यांना भुजबळांची सुटका व्हावी, असं वाटतंय... यामागं नेमकं काय गौडबंगाल आहे? तुरूंगात खितपत पडलेल्या भुजबळांवर अन्याय झालाय का? राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, एकट्या भुजबळांवरच राजकीय कारवाई झाली का? आणि भुजबळांना पावन करून घेण्याची भाजपची योजना आहे का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.