दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं मिशन २०१९ ची व्यूहरचना निश्चित केली आहे. शिवसेनेबरोबर युतीसाठी आग्रही आणि आशावादी असलेल्या भाजपचं सत्ता स्थापनेचे उद्दिष्ट पुन्हा गाठण्यासाठी पक्षाचा कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असणार आहे. आगामी निवडणुकीत २०१४ प्रमाणे पक्षाची परिस्थिती नाही याची कल्पना भाजप नेत्यांना आहे. मोदी लोकप्रियेतची लाट ओसरलीय, त्यामुळे यंदा भाजपची भिस्त ही पुन्हा मित्रपक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
पक्षांतर्गत व्यूहरचनेनुसार बूथ हा अत्यंत महत्वाचा केंद्रबिंदू ठरवण्यात आलाय. बूथप्रमुख सूत्रधार असेल तर ८०० ते १२०० मतदारांसाठी एक बूथप्रमुखाची नेमणूक करण्यात आलीय. त्यानं स्वतःची २५ कार्यकर्त्यांचं पथक बांधायचं आहे. या पथकानं समाज,भाषा, संस्कृतीतल्या दैनंदिन घडामोडी टिपायच्या आहेत. लोकांचा राजकीय कल कुठे ? तसेच आर्थिक स्तर, समस्या यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानं ही माहिती बूथप्रमुख वॉर्ड प्रमुखापर्यंत पोचवायची. मग ती माहिती मंडल प्रमुखापर्यंत जाईल, पुढे जिल्हाप्रमुख ती माहिती वॉररूम पर्यंत पोहोचवेल. वॉररूम आणि मुख्यमंत्री यांचा एकमेकांशी थेट संपर्क असेल. निवडणुकीसाठी पक्षकामाचं संचालन करण्याची जबाबदारी वॉररूमची असेल. प्रत्येक बूथप्रमुखाला त्याच्या मोबाईल फोनवर PM ऍप डाउनलोड करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
व्यूहरचनेच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईत ३६ विधानसभेसाठी विस्तारक नेमण्यात आले आहेत. यातले बहुसंख्य विस्तारक हे संघ परिवारातले आहेत. पक्षाच्या आमदारांवर अन्य दोन विधानसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या व्यूहरचनेसाठी विशेष लक्ष दिलंय. संघटनात्मक बळ आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्या मिलाफाने प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. जमिनीत सुरू असलेले कंप जाणा, जमिनीशी जोडले जा अशा कार्यकर्त्यांना सूचना आहेत. बूथप्रमुखांची साप्ताहिक बैठक सक्तीची आहे.
हा प्रत्यक्ष निवडणुकीच्या तीन महिने आधी सुरु होईल. अन्य पक्षांचे नेते-पदाधिकारी यांच्यापेक्षा दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश करून निवडणुकीच्या दृष्टीनं उपयोग करून घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात नाराज शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेण्याचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. युतीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचे जुने सूत्र कायम राहील, पण विधानसभा निवडणुकीसाठी प्रसंगी तडजोडीची राज्यातील भाजप नेत्यांची प्राथमिक तयारी आहे.