पंकजा मुंडेंशी रक्ताचं नातं, ते तुटणार नाही - धनंजय मुंडे

'रक्ताचं नातं तुटतं नाही'

Updated: Oct 26, 2019, 04:57 PM IST
पंकजा मुंडेंशी रक्ताचं नातं, ते तुटणार नाही - धनंजय मुंडे
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल गुरुवारी जाहीर झाले. विधानसभा निवडणूकीत महायुतीने बहुमत मिळवलं असलं, तरी राष्ट्रीवादीनेही अनपेक्षित विजय मिळवला आहे. या निवडणूकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणीच्या संघर्षाकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. अखेर परळी मतदारसंघातून या चुरशीच्या लढतीत धनजंय मुंडे यांनी बाजी मारली. मात्र माझी निवडणूक वेगळ्या परिस्थितीत झाली असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

बहिण - भावाच्या नात्याला कलंक लावून सहानुभूती मिळवण्याचा आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासाठी हा अतिशय क्लेशदायक प्रकार असल्याचे ते म्हणाले.

आपण भलेही वेगळ्या पक्षात आहोत, एकमेकांच्या विरोधात लढतोय, पण अशा नात्याला कलंक लागायला नको ही काळजी घ्यायला हवी. धनंजय मुंडे हा विषय त्यांच्यासाठी संपला असेल त्यांनी तो त्यांच्याकडून संपवला असेल, पण रक्ताचं नातं आहे, उद्या माझं बरं-वाईट झालं, तर शेवटी दु:ख व्यक्त करायला यावं लागेल ना? असा सवालही त्यांनी केला.
 
भलेही वेगळे होईल, त्यांच्यात संवाद राहणार नाही, वैर असेल, तरी कोणी कितीही प्रयत्न केला तरी रक्ताचं नातं तुटतं नाही. कदाचित हीच माहिती आमच्या बहिणीला नसावी. नातं त्यांना ठेवायचं नाही, माझ्यादृष्टीने ते तुटणार नाही, ते रक्ताचं असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

  

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन जिथे नुकसान झालंय तिथे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमची युती अभेद आहे, अतूट आहे असं म्हणणार्‍या युतीला बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा दावा करता येत नाही, याचा अर्थ युतीत काही तरी गोंधळ नक्कीच दिसतोय, असंही ते म्हणाले.

शिवसेनेला समर्थन देऊन आम्हाला सत्तेत यायचं नाही हे शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेला वाटत असेल आपली बार्गेनिंग पॉवर वाढलीय, तर त्यांनी मुख्यमंत्री पद घ्यावं, आम्ही विरोधी पक्षात आहोत ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली असल्याचं त्यांनी सांगितलं.