IndiGo flight: बॉम्बची धमकी कोणी दिली? टिश्यूपेपरवरील अक्षर पाहून सूत्र चाळवताच समोर आली अनपेक्षित माहिती

IndiGo flight: अनेक एजन्सी या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान टिश्यू पेपरवर लिहिणाऱ्या आरोपींची ओळख मात्र अजून पटलेली नाही. दरम्यान यासंदर्भात आता हस्ताक्षराचे नमुने घेतले गेले आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Feb 16, 2024, 07:53 AM IST
IndiGo flight: बॉम्बची धमकी कोणी दिली? टिश्यूपेपरवरील अक्षर पाहून सूत्र चाळवताच समोर आली अनपेक्षित माहिती title=

IndiGo flight: 13 तारखेला इंडिगो विमानाबाबत एक मोठी घटना घडली. चेन्नईवरून मुंबईत येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीला इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपर हा धमकीचा मेसेज सापडला होता. विमानात बॉम्ब असल्याचं यामध्ये लिहिण्यात आलं होतं. अनेक एजन्सी या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान टिश्यू पेपरवर लिहिणाऱ्या आरोपींची ओळख मात्र अजून पटलेली नाही. दरम्यान यासंदर्भात आता हस्ताक्षराचे नमुने घेतले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय की, विमान चेन्नईहून मुंबईला येत होतं. मुंबईच्या 40 किलोमीटर आधी केबिन क्रू मेंबरला टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर विमानात बॉम्ब असल्याचं लिहिलेलं सापडलं. यानंतर त्याने संबंध घटनेची माहिती पायलटला दिली.

हस्ताक्षराचे घेतले गेले नमूने

दरम्यान यासंदर्भात तात्काळ ट्रॅफिक कंट्रोल रूमला यासंदर्भात माहिती देण्यात आली. विमान मुंबईत उतरण्यापूर्वी सर्व सुरक्षा कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. यावेळी सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. विमानात असलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सीआयएसएफ टीमने लहान मुलं वगळता सर्व प्रवाशांचे हस्ताक्षराचे नमुने घेतले.

दरम्यान या नमुन्यांपैकी कोणत्याही प्रवाशाचं हस्ताक्षर टिश्यू पेपरवरील हस्ताक्षराशी जुळले नाही. अधिकाऱ्याच्या मते यामागे दोन कारणं असू शकतात. टिश्यू पेपर मऊ असतो आणि त्यातून शाई पसरते. दुसरं म्हणजे टिश्यू पेपरही लिहिताना काही प्रमाणात फाटू शकतो. यामुळे टिश्यू पेपरवरील हस्ताक्षरही थोडं वेगळं दिसण्याची शक्यता आहे.

पुढील तपास सुरुच

दुसरीकडे यासंदर्भात पोलिसांचा तपास अजून सुरुच आहे. यामध्ये आता विमानातील टिश्यू पेपर इतर कोणत्या प्रवाशाने तर नाही काढला ना, या अँगलने पोलिसांचा तपास सुरु आहे. जर एखाद्या व्यक्तीने तो खिशात ठेवला असण्याची शक्यता आहे. नंतर त्याने त्यावर काहीतरी बॉम्ब लिहून हा टिश्यू पेपर त्याच्या एका मित्राला दिला असावा. 

चेन्नई ते मुंबई प्रवासादरम्यान या मित्राने हा टिश्यू पेपर या विमानाच्या टॉयलेटमध्ये ठेवला असावा. याप्रकरणी मुंबईतील सहार विमानतळ पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आलाय. तपास विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांचे मोबाईल नंबर नोंदवण्यात आले आहेत.