डोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्र

बीएमसीने २०१७ रोजी केसरबाई या इमारतीला पत्र पाठविले होते.

ANI | Updated: Jul 16, 2019, 03:49 PM IST
डोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्र title=

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ७ ऑगस्ट २०१७ रोजी केसरबाई या इमारतीला सी १ म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. ती धोकादायक असून ती लवकरच पाडणे गरजेचे आहे. कोणतीही दुर्घटना घडण्याआधी ती पाडणे अत्यंत गरजेचे आहे, असे पत्र संबंधित इमारतीला मुंबई पालिकेने दिले होते. तरीही ही इमारत खाली करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे या इमारतीच्या अपघाताला कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण पालिकेने पत्र पाठवून जर अपघात घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही २०१७ रोजी दिलेल्या पत्रात नमुद केले होते.

मुंबईतल्या डोंगरी भागात केसरबाई ( Kesarbai building) ही इमारत कोसळली. या अपघातात १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, राज्याचे गृहनिर्माण मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत आहे. ही म्हाडाची इमारत होती, विकासकाकडे या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. तरीही इमारत का पडली? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, ही इमारत म्हाडाची नसल्याचे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही इमारत कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ही इमारत पालिकेचा अंतर्गत असल्याने पालिकेने २०१७ ला धोकादायक इमारत म्हणून संबंधित इमारतीला पत्र दिले होते. 

दरम्यान, डोंगरी अपघातग्रस्त इमारतील पीडितांसाठी मुंबई महानगरपालिकेने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. येथील पालिकेच्या इमामवाडा मुलींच्या माध्यमिक शाळेत ही व्यवस्था केली आहे. या इमारतीमध्ये १० ते १५ कुटुंब राहत होती, अशी माहिती मिळत आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, दुर्घटनाग्रस्त इमारत १०० वर्षे जुनी होती.