आता हिवाळी नाही उन्हाळी अधिवेशन होणार नागपूरला, कुठे झाला निर्णय वाचा...

कोरोनाचे कारण पुढे करून दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झालेलं नाही

Updated: Dec 27, 2021, 06:53 PM IST
आता हिवाळी नाही उन्हाळी अधिवेशन होणार नागपूरला, कुठे झाला निर्णय वाचा... title=
संग्रहित छाया

मुंबई : दरवर्षी नागपूरला (Nagpur) होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Session) कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा मुंबईत (Mumbai) घेण्यात आले. मात्र, पुढील होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) नागपूर येथे घेण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, २०१८ साली भाजप-शिवसेना युती सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले होते.

दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणूक झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाविकास आघाडी सरकारचा २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर शपथविधी सोहळा पार पडला होता.

त्यांनतर, नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आघाडी सरकार विरोधकांना सामोरे गेले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाचे कारण पुढे करून दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झाले नाही. त्यामुळे नागपूर कराराप्रमाणे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती.  

विरोधकांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आघाडी सरकारचे आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. हे अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून होणार असून नागपूरला होणारे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.