विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती समोर; CID चौकशीनंतर गुन्हा दाखल

Vinayak Mete Accidental Death :  या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते

Updated: Nov 16, 2022, 01:13 PM IST
विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती समोर; CID चौकशीनंतर गुन्हा दाखल title=

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते. त्यानतंर आता सीआयडीच्या चौकशीनंतर जवळच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai–Pune Expressway) भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना विनायक मेटे यांना मृत घोषित केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले होते. (case registered against the driver in the accidental death of Vinayak Mete)

सीआयडीच्या चौकशीनंतर आता विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कदम असे या ड्रायव्हरचे नाव आहे. मेटो यांच्या गाडीने समोरच्या गाडीला धडक दिली. या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. यावेळी मेटे यांचा अंगरक्षकही जखमी झाला होता. विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सीआयडीच्या चौकशीनंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यामध्ये कलम 304 (2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी  विनायक मेटे हे 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं.

सीआयडीने सीसीटीव्ही तपासले असता विनायक मेटेंचा चालक 130-140 ताशी किलोमीटर वेगाने गाडी चालवलत असल्याचे समोर आले. गाडीचा अपघात होण्याआधी चालकाने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असेही सीआडीच्या तपासात समोर आलं आहे. यानंतर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.