मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. देशमुख यांच्या राज्यातील अनेक मालमात्तांवर हे छापे टाकले गेले असून दरम्यान देशमुख यांच्याशी संबधित 8-9 जणांचे जबाब नोंदवले असल्याचीही माहिती समोर येत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या घरावर आणि मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. देशमुख यांच्याशी संबधित असलेल्या 8-9 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
सीबीआयने या छापेमारीबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.