देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेवरुन रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रोजची गर्दी रेटारेटी याला मुंबईकर वैतागलाय. दररोज लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रेल्वेचे प्रवासी वाढतायत. पण लोकलची संख्या वाढवण्यावर प्रचंड मर्यादा आहे. तरीही यंदा रेल्वेनं प्रवाशांचा प्रवास थोडा सुखकर व्हावा यासाठी काही निर्णय घेतले आहेत.
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. शिवाय १२ डब्याच्या साध्या लोकलला तीन डबे तर १५ डब्यांच्या लोकलला ६ डबे एसीचे जोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. मध्य रेल्वेवरही एसी लोकल सुरू होणार आहेत. या लोकलना कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. यंदा मध्य रेल्वेनं नव्या लोकल सुरु केल्या नाहीत. पण आहे त्या लोकल वेळापत्रकाप्रमाणं चालवण्याचा रेल्वेनं निर्धार केलाय. ठाणे ते कल्याण मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग यंदा सुरु होण्याची शक्यता नाही. दादरची गर्दी कमी करण्यासाठी परळहून नव्या ट्रेनही हव्या तेवढ्या संख्येने सुरू झालेल्या नाहीत. रेल्वेनं लोकलचं तिकीट काढण्यासाठी एटीव्हीएम मशीन वाढवण्यास सुरुवात केलीय. या मशीन अद्यावतही केल्या जातायत. पण प्रवासी संख्येच्या तुलनेत त्या अगदीच तोकड्या पडतायत. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा रेल्वे प्रवास महागणार आहे.
रेल्वेच्या खानपान सेवेचे दर वाढणार आहेत. याशिवाय एसी वर्गातील रेल्वेभाडेही वाढणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर आयआरसीटीसीची खासगी रेल्वे धावणार आहे. येत्या काळात अनेक खासगी रेल्वे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे.