दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली असली, तरी राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. राणेंपुढील आव्हाने आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा हा आढावा.
शिवसेनेतील कट्टर शिवसैनिक, नंतर काँग्रेसचे नेते आणि आता नव्या पक्षाचे संस्थापक असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास आता नव्या वळणार येऊन ठेपलाय. हा प्रवास राणेंसाठी सोपा नसून एकदम आव्हानात्मक असणार आहे. नवा पक्षाच्या वाटचाल ही राणेंची राजकीय अस्तित्वाची लढाईच असणार आहे.
राज्यात नजिकचा काळात अस्तित्वात आलेल्या राजकीय पक्षांच्या तुलनेत राणेंकडे पक्ष स्थापन करताना राणेंच्या पारड्यात अनेक त्रुटीच आहेत. 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापने केली तेव्हा त्यांच्या त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोठी फौज आली होती. त्या जोरावरच राष्ट्रवादीने तीन वेळा राज्यात सत्तेत वाटा उपभोगला आहे.
पवारांसारखा दिग्गज नेता असतानाही एका ठराविक मर्यादेपलिकडे राष्ट्रवादी काँग्रेस वाढला नाही. 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची घोषणा केली. मनसेबरोबरही शिवेसनेतून पदाधिकाऱ्यांची फौज बरोबर आली. राज ठाकरेंवर प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी क्रेझी असलेला मोठा कार्यकर्त्यांचा वर्गही सुरुवातीला त्यांच्याबरोबर होता. तरीही 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे केवळ 13 आमदार निवडून आणू शकले. त्यानंतर मात्र मनसेचा प्रभाव ओसरू लागला आणि पक्षाला ओहोटी लागली.
नारायण राणे मागील दोन दशके राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेते आहेत. त्यामुळेच मागील सहा महिने राणे काय करणार याबाबत उत्सुकता होती. आता लोकांना उत्सुकता असणार ती नारायण राणेंच्या नव्या पक्षाची वाटचाली कशी असणार त्याची.. निश्चितच राणेंच्या पक्षाची वाटचाल सोपी नाही.
शिवसेना सोडली तेव्हा राणेंबरोबर अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेतून बाहेर पडून त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये आले. मात्र यातले केवळ थोडेच आता राणेंबरोबर राहिले आहेत. काँग्रेस सोडताना राणेंबरोबर कुणीही आमदार, पदाधिकारीसोबत नाहीत. त्यामुळेच नव्या पक्षाची स्थापना करून नारायण राणेंनी एक धाडसी पाऊल उचललं आहे. राणेंच्या या पक्षाची पाळंमुळं नीट रुजली नाहीत तर हे धाडस राणेंची राजकीय कारकीर्दी संपवणारेही ठरू शकते.
त्यामुळेच राणेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काही प्रश्न उपस्थित होतात..
- कोकणात, त्यातही सिंधुदुर्गात प्रभाव असलेले राणें आपला पक्ष राज्यात कसा विस्तारणार ?
- राणें भाजपाबरोबर जाण्याची शक्यता आहे, मात्र इतर मित्रपक्षांची जी अवस्था भाजपाने केली आहे, ती राणेंच्या पक्षाची होणार नाही का ?
- राणेंचा पक्ष निवडणूक स्वबळावर लढवणार की भाजपाबरोबर युती करून ?
- स्वतंत्र निवडणूक लढवली ती उभे करायला उमेदवार मिळणार का
- भाजपाबरोबर लढवली तर भाजपा राणेंना किती जागा देणार
असे अऩेक प्रश्न राणेंसमोर पुढील राजकीय वाटचाल करताना असणार आहेत.
नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यात असलेला उत्साह आणि काँग्रेस सोडताना राणेंचा उत्साह यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळेच राणेंनी नवा पक्ष स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धाडसी आहे. या सगळ्या कारणांमुळे शरद पवार आणि राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षांपेक्षा नारायण राणे यांच्या पक्षाची वाटचाल अत्यंत जिकरीची असणार आहे.