मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटळला आहे. भुजबळांना जामीन देऊ नये म्हणून ‘ईडी’च्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील जामिनासंदर्भातील कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर अटकेत असलेले छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना जामीन मिळणाऱ्या आशा पल्लवित झाल्या होत्या. विशेष न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना दणका दिलाय. त्यामुळे भुजबळ यांना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
‘पीएमएलए’च्या कलम ४५अन्वये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन नाकारला जात होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे कलम अवैध आणि जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे नमूद करत नुकतेच ते रद्द केले. त्यामुळे ‘पीएमएलए’अंतर्गत अटकेत असलेल्या आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.