मुंबई : मेहुण्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप (BJP) नेत्यांच्या सूडाच्या राजकारणाविरोधात लढायचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भाजपविरोधात ठाकरे सरकार नेमकी काय व्यूहरचना आखतंय, पाहूयात हा रिपोर्ट. (chief minister uddhav thackeray aggresive after ed get action against his brother in law yogesh patankar)
मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईचे जोरदार पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी यावेळी ईडीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॅबिनेटमध्ये काय म्हणाले मंत्री?
केंद्राचं सूडाचं राजकारण थांबतच नाही. ईडीच्या कारवाया वाढतच चालल्यात. राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकायला हवं. त्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते सूडाच्या भावनेनं वागत असताना आपण का शांत बसायचे? असा संतप्त सवालही काही मंत्र्यांनी केल्याचं समजतंय.
त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मेहुण्यावरील कारवाईचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही. मात्र जवळपास २० मिनिटं ते बोलत होते, असं सूत्रांनी सांगितलं.
ठाकरेंचा निर्धार, लढत राहा जोरदार?
ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे. कधी नव्हे इतकं खालच्या पातळीवरचं राजकारण भाजपकडून खेळलं जातंय. या कारवायांना अजिबात घाबरण्याचं कारण नाही. यांच्या दबावाखाली येण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही मला कारवाई करायला सांगत आहात.
मी तर आहेच. पण तुम्ही देखील फडणवीस सरकारच्या काळातील भाजप नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा.भाजपच्या खात्यातील पाच वर्षांतील प्रकरणांच्या फायली तयार करा. शेवटी माझी मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय..
श्रीधर पाटणकरांवरील कारवाई हे थेट मातोश्रीला आव्हान असल्याचं मानलं जातंय. या कारवाईमुळं संतापलेले मुख्यमंत्री आता खरंच भाजपचं उट्टं काढणार का, याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.