मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : तुमची लहान मुलं मोबाईलवर काय बघतात याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण देशात अल्पवयीन मुलांबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या ५ महिन्यात २५ हजार चाईल्ड पोनोग्राफीच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतील 'चाईल्ड सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्सप्लोयटेड children' या संस्थेच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात कार्यरत असलेल्या 'चाईल्ड सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्सप्लोयटेड children' या संस्थेच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. गेल्या पाच महिन्यांतील ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी पाहता पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हे पॉर्नोग्राफी व्हिडिओ सोशल मीडियात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील १७०० प्रकरणांचा तपास करण्यासाठी राज्याच्या सायबर विभागाने 'ऑपरेशन ब्लॅकफेस' मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत चाईल्ड पॉर्नोग्राफी तयार करण्याखेरीज याबाबत माहिती गोळा करणं, माहिती सर्च करणं, माहिती ब्राऊझ करणं, डाउनलोड करणं, एक्सचेंज करणं, माहिती वितरित करणं हे देखील गुन्हे आहेत.
लहान मुलांवर अशाप्रकारे पॉर्नोग्राफी बनवणारे भरपूर पैसे कमवतात, अशा पॉर्नोग्राफीद्वारे आपली वासना शमवणारे विकृत असतात. ज्या मुलांवर ही पॉर्नोग्राफी बनवली जाते त्यांच्या मानसिकतेवर आयुष्यभर वाईट परिणाम होत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
परदेशात इंटरनेटवर अश्लील चित्र आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाते आणि त्यांना शोधून कठोर शिक्षाही केली जाते. भारतातही अशा प्रकारे विकृत लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुलं म्हणजे देवघरची फुलं असं म्हटलं जातं. मात्र काही लहान मुला- मुलींचं बालपण अशा पद्धतीने कुस्करुन टाकलं जातं. अशा विकृतीला संपवण्यासाठी आपण सर्वांनीच कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.