व्हिडीओत पाहा, पोलिसांनी कसं रोखलं, चिंचपोकळी चिंतामणीच्या हजारो गणेश भक्तांना...

पोलिसांनी ही सूट हळूहळू काढून घेतली की काय असं वाटत होतं, तितक्यात लालबागराजाच्या समोरीला चौकात, म्हणजे श्रॉफ बिल्डिंगच्या चौकात

Updated: Sep 19, 2021, 05:59 PM IST
व्हिडीओत पाहा, पोलिसांनी कसं रोखलं, चिंचपोकळी चिंतामणीच्या हजारो गणेश भक्तांना...

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही बसमधून काढण्यात आली. कोव्हीडमुळे गणेशविसर्जन मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आलेल्या आहेत. यात चिंचपोकळीच्या बाप्पांची मिरवणूक भक्तांनी आरत्या आणि गाणी म्हणत, सरदार हॉटेलच्या चौकात आणली, तोपर्यंत गणेशभक्तांची मांदियाळी बसच्या मागेपुढे दिसत होती, गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. कोणतंही वाद्य नसताना भक्तांनी बाप्पासाठी एका तालात सुंदर गाणी म्हणणं सुरुच ठेवलं होतं, बाप्पांवर भक्तांनी झेंडूच्या फुलांची उधळण सुरुच ठेवली होती.

मुंबई पोलिसांनी अशी फिल्डिंग लावली

पण नियमांचं भंग होवू नये हे देखील पोलिसांच्या मनात होतं, पोलिसांनी ही सूट हळूहळू काढून घेतली की काय असं वाटत होतं, तितक्यात लालबागराजाच्या समोरीला चौकात, म्हणजे श्रॉफ बिल्डिंगच्या चौकात बाप्पाचं आगमन होण्याआधी पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि एका क्षणात ही मोठी मिरवणूक फक्त बाप्पा आणि निवडक कार्यकर्त्यांसह पुढे जाऊ दिली आणि हजारो भक्तांना मात्र जागीच थांबवलं. 

बाप्पाला अचानक निरोप द्यावा लागल्याने हिरमोड

यात चिंचपोकळी चिंतामणीच्या बससमोरील काही शेकडो कार्यकर्ते ज्यांना वेगाने बससमोर पळता आलं, त्यांनी बससमोर धावून मार्ग काढला, पण पोलिसांना हजारो भक्तांना रोखण्यात यश आलं, पण अचानक आपला बाप्पा ज्या बसमध्ये विराजमान आहेत, त्या बाप्पांची बस अचानक पुढे निघून गेल्याने भक्तांची हिरमोडही झाला. पण बाप्पाच्या मिरवणुकीत गैरप्रकार नको म्हणून बाप्पाला तिथूनच नमन करुन गणेशभक्त जड पावलांनी घरी परतले.

धोकादायक पुलावरुन वाहतूक सुरु असते त्याचं काय?

भक्तांनी नंतर दुसऱ्या मार्गांनी बस गाठण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बाप्पा बसमधून चिंचपोकळी स्टेशनच्याही पुढे गेला होता. जड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या चिंचपोकळीच्या धोकादायक आर्थर पुलावरुन जड वाहनांची पोलिसांसमोर जीवघेणी वाहतूक वर्षभर सुरु असते , ती देखील पोलिसांनी खास करुन काळाचौकी पोलिसांनी अडवून कर्तव्यदक्षता दाखवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.