पनवेलमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

मॅनहोलमध्ये सुरुवातीला दोन कामगार उतरले होते.

Updated: Jan 9, 2019, 09:26 PM IST
पनवेलमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू title=

नवी मुंबई: पनवेल परिसरात बुधवारी मॅनहोलमध्ये उतरलेल्या सिडकोच्या तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. येथील साळुंद्रे गावातून जाणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या साफसफाईसाठी सिडकोचा कंत्राटदार विलास म्हसकर आणि दोन कामगार मॅनहॉलमध्ये उतरले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ४० ते ५० फूट खोल असलेल्या या मॅनहोलमध्ये सुरुवातीला दोन कामगार उतरले होते. ते बराचवेळ बाहेर न आल्याने कंत्राटदार विलास म्हसकरही आतमध्ये उतरला. परंतु, तोदेखील न परतल्याने स्थानिकांनी अखेर अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांचे मृतदेह मॅनहोलमधून बाहेर काढले. या तिघांनी कोणतीही सुरक्षा उपकरणे न घातल्याने विषारी वायू त्यांच्या नाकातोंडात गेला. यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. यावरून सिडको प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी तिघांच्या मृत्यूस सिडकोला दोषी ठरविले आहे. मृतांपैकी कंत्राटदार विलास म्हसकर, कामगार संतोष वाघमारे यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मात्र, अजून एका कामगाराची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.