मुंबई : coronavirus कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं नेमलेल्या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी असणाऱ्या डॉ. संजय ओक यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत कोरोना संसर्गाच्या बाबतीत शहरात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याविषयीची माहिती दिली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं असतानाच ओक यांची टास्क फोर्सच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. सध्याच्या घडीला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या, रुग्णवाढीचा वेग, मृत्यूदर आणि रुग्णांची दुपटीनं वाढणारी संख्या या गोष्टी काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहेत. मुंबईकरांसाठी आणि अथक परिश्रम घेत असणाऱ्या प्रशासनासाठी हा मोठा दिलासा असला तरीही डॉ. ओक यांनी आणखी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे.
कोरोना काही अंशी नियंत्रणात येताना दिसत असला तरीही, मान्सूनचे येऊ घातलेले दिवस, नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा उडणारा गोंधळ या साऱ्यामध्ये अनेक आव्हानं उभी करु शकतो.
केंद्राकडून देण्यात आलेल्या आकडेवारीचा हवाला देत 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत कोरोनानं उच्चांक गाठणं अपेक्षित होतं. ज्यामध्ये रुग्णसंख्या ७५००० पर्यं पोहोचली असती. पण, या महिन्याच्या अखेरीस मुंबईत ३९४४४ कोरोना रुग्ण आढळले. सोमवारपर्यंत हा आकडा ६७६३५ पर्यंत पोहोचला. परिणामी, हा आकडा वर्तवण्यात आलेल्या अंदाजाहून कमीच ठरल्याचं स्पष्ट झालं.
शेतात राबतोय राष्ट्रीय पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता
आकडेवारीमध्ये असणारा हा फरक पाहता डॉ. ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर दिवशी मुंबईत कोरोनाच्या वाढीचा अपेक्षित उच्चांक पाहता जवळपास ३००० कोरोना रुग्ण आढळतील असा अंदाज होता. पण, हजाराच्याच आसपास ही रुग्णसंख्या दिसत आहे. असं सांगत असताना ही आकडेवारी पाहता शहरावर असणारं कोरोनाचं संकट टळलं आहे, असं नाही ही बाबही त्यांनी आवर्जून नमूद केली.
काही दिवसांपासून सुरु झालेली अनलॉकची प्रक्रिया, विविध टप्पे आणि पाऊस हे सारं चित्र पाहता येत्या काळात आणखी एक लाट पाहायला मिळू शकते असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
टास्क फोर्सनुसार सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढीचा वेग हा ३७ दिवसांवर पोहोचला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण १३ दिवसांवर होतं. ३० दिवसांवरील कालावधी हा तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित समजला जातो. परिणामी कोरोनाचा उच्चांक गाठण्याची लाट मुंबईतून ओसरली हे त्यांनी स्पष्ट केलं. शहरात सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक असल्याचं कळत आहे. हेच प्रमाण वाढवून ७० टक्के आणि त्याहूनही पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही डॉ. ओक यांनी सांगितलं.
नवे हॉटस्पॉट ठरत आहेत आव्हानाचा विषय
धारावी, वरळी या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या फरकानं नियंत्रणात येत असतानाच शहरात आता नव्यानं कोरोना हॉटस्पॉट डोकं वर काढत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. अशा ठिकाणांसाठी पालिका प्रशासनाकडून रॅपिड ऍक्शन प्लान तयार करण्यात येत आहेत. यामध्ये मुलुंड, भांडुप, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, कांदिवली या भागांचा समावेश आहे. येत्या काळात नव्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. 'मिशन झिरो' अंतर्गत शहर कोरोनामुक्त करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत.