मोठी बातमी! मुंबईत 'या' तारखेपासून सुरु होणार 8 वी ते 12 वीचे वर्ग

मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची मंजुरी

Updated: Sep 29, 2021, 08:39 PM IST
मोठी बातमी! मुंबईत 'या' तारखेपासून सुरु होणार 8 वी ते 12 वीचे वर्ग title=

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने राज्यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनचा एक भाग म्हणून राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याला परवागनी देण्यात आली आहे.

त्यानुसार बृहन्मुंबई क्षेत्रातील ((Mumbai Municipal Corporation) सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मंजुरी दिली आहे. इतर वर्गाच्या शाळा कधी सुरू करायच्या, याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला जाणार आहे. 

सुचनांचं पालन करण्याचं आवाहन

1 - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावं.

2 - शाळा सुरु करण्यापूर्वी आणि शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाळण्यात याव्यात.

3 - मनपा शाळांचं सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक्लोराईड सोल्यशनने निर्जुंतुकीकरण करुन घेण्यात यावे तसंच इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गाचे निर्जुंतुकीकरण करुन घ्यावं.

4 - शाळांमधील कोव्हिड लसीकरण केंद्र आणइ कोव्हिड विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरित करुन वापरण्यायोग्य सुस्थितीत करावे.

5 - कोव्हि़ड सेंटर, रेल्व स्टेशनवर कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसंच निवडणुक विषयक कामासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावं.

मुंबईसह राज्यातील शाळा सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.